Educational Video Competition Result : सद्याचे आंतरजालाच्या युगात ई- लर्निंग खूप महत्व असून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांनी ई-लर्निंग (e-learning) साठीच्या साधनांसाठी या व्हिडिओंचा उपयोग करत गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण प्रसंगी मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे केंद्रीय सहसचिव अर्चना शर्मा-अवस्थी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा मुख्य उद्देश गुणवंत विद्यार्थी घडविणे हा आहे. व्हिडिओचा उपयोग शिक्षण प्रणाली सुधारण्यास खूप मदत होईल. या स्पर्धेअंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यात खूप प्रयोग करण्यात आले असून 84 पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षकांकडे संगणक साक्षरता नसेल तर त्यांना असाक्षर म्हणावे लागेल, असे हे युग आहे.
‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी
नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यात नवीन अभ्यासक्रम अंमलात आणला जात आहे. यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल. कृषी विषयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा घटला आहे. कृषी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. गुणवंत विद्यार्थी घडवून राज्याची प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतीकडे, व्यावसायिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कमीत कमी खर्चात व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. जास्तीत जास्त कुशल तरुणांनी जर्मनीत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री. रेखावार म्हणाले, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेला राज्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदीर्घ चाललेल्या अटीतटीच्या या स्पर्धेत विजेते ठरविणे खूप अवघड होते. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी या स्पर्धेचा चांगला उपयोग होईल. शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन बिंदू आहेत. या दोन्ही बिंदूना प्रेरित करण्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची ठरली, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात विजेत्यांचा मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंश, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्यासह राज्यातील शिक्षक उपस्थित होते.